संपादक
कोल्हाटी समाजामध्ये नोकरीचे प्रमाण अत्यल्प असे आहे. या समाजातील कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबाला लक्ष्मी
घरात आल्याचा आनंद होतो तर कुटुंबात मुलगा जन्माला आला तर म्हणावा तसा आनंद होत नाही
याचे कारण म्हणजे या समाजात असलेल्या रूढी परंपरा. कोल्हाटी समाजातील बांधव आणि महिला
उदरनिर्वाहासाठी कलेचा आश्रय घेतात हे आनंददायी आहे परंतु समाजातील ज्या आजपर्यंत आलेल्या
रूढी परंपरा आहेत त्या परंपरेत सुधारणा केली पाहिजे म्हणजे मुलगा आणि मुलगी यामध्ये
समान हक्काची न्याय प्रणाली असायला हवी. उदा. ज्यावेळी मुलगा मुलगी यांच्या लग्नाची
पाहणी ते लग्न असा जो कार्यक्रम असतो तो एकतर्फी असतो. मुलाला मुलगी पाहण्यासापासून
ते लग्न पार पडे पर्यंत मुलाच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना वरदक्षिणा द्यावा
लागतो त्यामुळे गरीब असो व श्रीमंत त्या मुलाच्या आई वडिलांना ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) ते ५,०००००/- (पाच लाख रुपये)
व त्यापुढेही खर्च होऊ शकतो. मुलीच्या आई वडिलांना खर्च नसतो. सारा खर्च मुलाच्या आई
वडिलांनी करायचा असतो ही कोल्हाटी समाजमधील परंपरा आहे त्यामुळे सध्याच्या या नवीन
तंत्रज्ञानाच्या काळामध्ये भरमसाठ खर्च मुलांच्या आई वडिलांना करावा लागतो. यामध्ये
सुधारणा होऊन मुलगा मुलगी यांना समान परिस्थिती नुसार त्यांच्या आई वडिलांना खर्च करण्याचा
अधिकार असायला हवा. त्यामध्ये समाजमधील जेष्ठ विचारवंत यांनी समाजबांधवांसाठी मेळावा
घेऊन त्यामध्ये परिवर्तनाचे मार्गदर्शन करावे. प्रबोधन करणे हे समाजातील प्रत्येकाचे
कर्तव्य आहे. या कोल्हाटी समाजात मुलगी म्हणजे लक्ष्मीचे “वरदान” आणि मुलगा म्हणजे
“शाप” आहे की काय? असा प्रश्न पडतो. समाजामध्ये चालत आलेली परंपरा
आहे त्यामध्ये काळानुसार बदल केला पाहिजे. मुलाच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना
आर्थिक (पैसा) देवून सोयरीक जोडली जाते ही परंपरा एकतर्फी आहे. या समाजात लग्नावेळी
असे असलेले बंधन न ठेवता समान अधिकार असायला हवा म्हणजे मुलगा मुलगी यांच्या वडिलांना
आनंद होईल. एक नवी पहाट उगवेल. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दोन्ही कुटुंबांना मार्ग
मिळाला असे म्हणता येईल. संपादक म्हणून माझ्याकडे माझ्या कोल्हाटी बांधवांनी ज्या व्यथावेदना
मांडल्या त्यामुळेच माझ्या लेखनी द्वारे विचारातून प्रबोधन व्हावे यासाठी लिहीत आहे.
हा समाज कष्टकरी, मेहनती आहे. तसेच या समाजाकडे माया, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, आदर इ. आहे. या बांधवांच्या व भगिनींच्या विचारात गोडवा आहे. या समाजाने काळाप्रमाणे
जुन्या रूढी परंपरा सोडून समान हक्क अधिकार समजून परिवर्तन केल्यास प्रगतीचा मार्ग
दिसेल. नवेचैतन्य दिसेल. त्याचप्रमाणे या समाजातील मुलामुलीने अंतरजातीय विवाह केल्यास
त्या मुलामुलीच्या कुटुंबांना “वाळीत” टाकले जाते ही मानवजातीसाठी एक अवहेलना आहे, अपमान आहे. समाजाने केलेल्या या आघातामुळे त्या कुटुंबावर भयानक परिणाम होताना
दिसतो. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही असे त्या कुटुंबांना वाटते. त्या कुटुंबाला
बहिष्कृत केले जाते ही वेदनादायी परिस्थिति आहे. जातीचे बंधन समाजासाठी अधोगतीचे लक्षण
असू शकते. समाजाच्या अशा बंधनामुळे समाजाचा रास होतो. या बंधनामुळे आपलेच कुटुंब परके
होते निराधार होते. कोल्हाटी समाजातील विचारवंत व्यक्तींनी समजाला “दिशा” देण्याचे
काम करावे “दशा” देण्याचे नको. कोल्हाटी समाजाचे ब्रीद वाक्य म्हणजे “अपमान नको, तर सन्मान झाला पाहिजे” अशी क्रांतिकारी, प्रेरणादायी, स्पूर्तिदायी, महत्वाकांक्षा भूमिका असायला हवी. नको
भेदभाव समान हक्क अधिकार हे ध्येय उद्दिष्टे असायला हवीत तरच समाजाची वाटचाल प्रगतीकडे
असेल. आपल्याच बांधवावरती जुन्या रूढी परंपरेनुसार आपण वागत गेलो तर तो अन्याय आहे
असेच होऊ शकते. त्यासाठी जुन्या रूढी परंपरा सोडून त्यामध्ये बदल करायला हवा असे वाटते.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र
वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.