भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
संपादक
भारतीय घटनेचे शिल्पकार प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२१ रोजी १३० वी जयंती सर्व जगभर मोठया आनंदात साजरी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके वाचली, त्यांचा संघर्षमय जीवन इतिहास वाचला, त्यांच्या विचारांची मला व माझ्या कुटुंबाला कसे जगावे, कसे रहावे, काय करावे, काय करू नये या विचाराची “शिदोरी”
मिळाली त्या विचारामुळे माझ्यात परिवर्तन झाले. मी सतत अवांतर वाचन आणि लिखाण करतो, मी व्यसनापासून अलिप्त राहिलो आहे. व्यसन हे स्वतःचे व कुटुंबाचे नुकसान करते. बाबांचे विचार हे माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी प्रेरणादायी, स्पृतीदायी ठरत आहेत. बाबांनी सांगितलेल्या विचारामुळे मी आचरण करू लागलो त्यामुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी व झुंज देण्यासाठी माझ्यामध्ये “बळ” निर्माण झाले. विचाराने माणूस शहाणा होतो. चांगले काय? आणि वाईट काय? याबाबत भूमिका बजावतो. मी बाबांचे विचार वाचले त्या विचारामुळे झुंजारवृत्ती माझ्यात निर्माण झाली. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाबांनी लिहिलेल्या संविधानाने दिलेले अधिकार त्यामुळे न्याय हक्कासाठी, लढण्यासाठी दक्ष असतो. अन्याय करणारे असतात त्यांना “जोर का झटका” कशा पद्धतीने द्यायचा ते मला संविधानामुळे समजले आहे. बाबांनी सांगितलेला विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी शिकलो, सर्व धर्म समभावात मिसळतो आणि न्यायासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करतो. बाबांनी सांगितलेल्या विचारामुळे मला मार्ग व दिशा मिळाली. त्यांचे विचार माझ्यासाठी “अमृत” आहेत. जो वाचेल, आत्मसात करेल तो कधीच भीती बाळगणार नाही. बाबांच्या विचारामुळे लेखणीद्वारे प्रबोधन करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली, माझा आत्मविश्वास वाढला. “रडत बसण्यापेक्षा लढत राहणे” यशासाठी संघर्ष महत्वाचा असतो. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" हा बाबांचा विचार मला गप्प बसू देत नाही. रक्त काढण्यासाठी जे हत्यार वापरले जाते त्यापेक्षाही विचाराचे हत्यार अन्याय करणारे असतात त्यांना घायाळ करू शकतात, वेदना देऊ शकतात. माझ्या आयुष्यात अनेक संकटमय वादळे आली व वेदना देऊन गेली, खडतर प्रवास सहन केला, मान-अपमान सहन केला पण मी कधी धीर सोडला नाही, डगमगलो नाही. उच्च शिक्षण घेऊन सन्मानित झालो. माझी पत्नी, मुलगा, मुलगी उच्च शिक्षण घेऊन पदवीधर आहेत. माझ्या आयुष्यात जे चढ-उतार आले त्यासाठी मी सामोरे गेलो. येणारा काळ भयानक आहे. याकाळात मी निर्भीडपणे विचार मांडत आहे. माझी संघटना बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना न्याय हक्कासाठी लढणारी आहे. बाबांच्या विचारामुळे क्रांतीची मशाल ज्योत माझ्यात निर्माण झाली. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी दिशा मिळाली, विचाराने प्रभावित झालो. बाबांचे विचार मला व माझ्या कुटुंबाला एक नवी पहाट दाखवू लागले. विचारात ताकत असते त्याची मला जाणीव झाली. बाबांचे विचार मला बळ देतात त्यामुळे मी सडेतोड लेखणीद्वारे विचार मांडतो. माझ्या बाबांच्या विचारामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले. बाबांमुळे मी माणसात आलो. शिकलो, सवरलो, शहाणा झालो. स्वाभिमानाचे जीवन जगू लागलो. बाबांचे उपकार देशासाठी व देशातल्या जनतेसाठी आदर्शवादी ठरत आहेत. पोट भरण्यासाठी भाकरीची गरज असते त्याचप्रमाणे परिवर्तनवादी, प्रबोधनवादी होण्यासाठी बाबांच्या विचाराची आज गरज आहे. १३० व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवाना आठवले परिवाराचा क्रांतिकारी जय भिम. जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार